प्रकाशा येथे ट्रक व मिनी ट्रकचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार

 प्रकाशा येथे ट्रक व मिनी -ट्रक मध्ये भीषण अपघात

तीन जण जागीच ठार तर दोन गंभीर....


शहादा (प्रतिनिधी)प्रकाशा येथील कोकणमाता मंदिराजवळ ट्रक व छोटी मिनी ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी 6वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात तीन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिनांक ७ मे रोजी सकाळी  सहा वाजेच्या सुमारास छोटा मिनी ट्रक (क्रमांक एम.पी.०९-एच.एच.५५११) मध्यप्रदेशातून गुजरात राज्यात लग्न समारंभासाठी लागणारे साहित्य तसेच धान्य घेऊन जात असतांना विसरवाडी- सेंधवा राष्ट्रीय महामार्गावर प्रकाशा गावाजवळ समोरून गुजरात राज्यातून मध्य प्रदेशकडे जाणारा ट्रक (क्रमांक जी.जे.५ बी.एक्स.-४४८३ ने जोरदार धडक दिली.छोट्या मिनीट्रकमध्ये चालकासह एकूण पाच जण होते. त्यापैकी तीन जण जागीच ठार झाले. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की छोट्या मिनी ट्रकचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. छोटा मिनी ट्रक मालट्रकच्या पुढील भागात घुसला.प्रकाशा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी येवून जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. जेसीबी यंत्राच्या साह्याने ट्रकमध्ये अडकलेल्या छोट्या मिनी ट्रकला बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी रक्ताच्या सडा पडलेला होता. छोट्या मिनिट ट्रक मधील सर्व साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. जखमींना मदत करण्यासाठी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे संदीप खंदारे, रामा वळवी,  जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सुरेश पाटील स्थानिक पत्रकार सह ग्रामस्थांनी मदत केली. अपघातानंतर ट्रक चालक व क्लीनर दोघेही फरार झाले आहेत.अपघातात हेमराज अंजने (वय ३९, रा. सुरत),  मनोज घाट्या (वय ४२, रा. सुरत) व भगवानभाई गोविंद पंचुले (वय ४८, रा. गोंदिया मध्यप्रदेश) हे तिन्ही जागीच ठार झाले आहेत. शहादा ग्रामीण रुग्णालयात डॉ.गोविंद शेल्टे,  डॉ. लक्ष्मीकांत साठे व डॉ.सत्यानंद पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातात गंभीररित्या जखमी झालेले मिनी ट्रक चालक गोलूभाई (रा.हिरापूर) व अनिकेत अंतिम (रा. हिरापूर,मध्यप्रदेश) या गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी भेट दिली. शहादा पोलिसात अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.पुढील तपास प्रकाशा पोलीस दुरक्षेत्राचे संदीप खंदारे करीत आहेत.

Comments