लांबोळा गावात मध्यरात्री घरफोडी,सात लाखांचे सोने चांदी चे दागिने केले लंपास

 लांबोळा गावात मध्यरात्री घरफोडी,सात लाखांचे सोने चांदी चे दागिने केले लंपास 


विजय पी पाटील 

शहादा, ता. 11: लांबोळा ता. शहादा येथे दि. १० एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या दोन घरांची कडीकोंडे तोडीत घरफोडी केली असून सुमारे सात लाख रुपयाच्या ऐवज चोरीस गेला आहे. लांबोळासह परिसरातील ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.


नरेंद्र सजन पाटील यांचे घर बंद होते. घराला कुलूप लावलेले होते. काही कामानिमित्त ते शहादा येथे गेलेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्याच्या फायदा घेऊन घराच्या पुढील दरवाज्याचे कडीकोंडा तोडून घरातील कपाटांचे कुलपे तोडून आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकीत बारा तोळे सोन्याचे दागिने तसेच रोख एक लाख रुपये मिळून सुमारे सात लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. घरातील दरवाजे उघडे ठेवूनच चोरट्यांनी पोबारा केला. तर त्याच रात्री श्रीमती सुरेखा विठ्ठल पाटील यांचे घर बंद होते. ते गुजरात राज्यातील बडोदा येथे गेलेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला. चोरट्यांना मात्र या घरातून केवळ सहा हजार रुपये रोख मिळाले ते लंपास केले. 


नरेंद्र सजन पाटील पाटील यांना घटनेची माहिती मिळाली असता ते सकाळी घरी आले. त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यानंतर कपाटे तोडून साहित्य अस्ताव्यस्त फेलेले दिसून आले. चोरी झाल्याचे निदर्शनास येताच लांबोळा येथील पोलीस पाटील प्रवीण पाटील यांनी प्रकाशा ता. शहादा येथील पोलिस दूर क्षेत्रात खबर दिली. शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे, पोलीस कर्मचारी युवराज राठोड, प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे संदीप हंडारेसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही घरांचे पंचनामे करून शहादा पोलिसात घरफोडीच्या गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी नंदुरबार येथून श्वान पथक आले. मात्र श्वान दोन्ही घरांचा रत्यावरून परत येत काही अंतरावर आडोश्याला घुटमळला. सी सी कॅमेरा मध्ये त्या जागी एक दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. घटनेच्या पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदीप हंडारे करीत आहेत.


एकंदरीत या घटनेवरून चोरट्यांनी आता शहरासह ग्रामीण भागाला लक्ष केल्याचे दिसून येते. गावात 25 वर्षानंतर चोरीची घटना झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पोलिसांची गस्त आवश्यक आहे.


सरपंच रवींद्र रावल यांनी ग्रामसेवकांना गावाच्या प्रवेशाच्या रस्त्यांवर मुख्य जागी सी.सी.tv कॅमेरे तातडीने बसविण्याची निर्देश दिले आहेत.

Comments