*आमच्या शाळेचे चित्रगुप्त भाऊसाहेब ह.भ.प. रामदास चौधरी! यांची सेवानिवृत्ती!*

 *आमच्या शाळेचे चित्रगुप्त भाऊसाहेब ह.भ.प. रामदास चौधरी! यांची सेवानिवृत्ती!*



बलवाड़ी प्रतिनिधी:–आशीष चौधरी 


 जून १९९० मधली गोष्ट. तेव्हा आमची शाळा सुरूही झाली नव्हती. बलवाडीत नवीनच शाळा सुरू होणार म्हणून आमच्या बलवाडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री.बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय येथे  सर्वच पदांसाठी मुलाखती आयोजित केल्या होत्या. अर्थातच त्या मुलाखतीसाठी मी पण गेलो होतो. शाळेच्या त्या वेळच्या इमारतीच्या वर्गाबाहेरच ओट्यावर एक ओळखीचा चेहरा मला दिसला. गव्हाळ वर्ण, उंच हसमुख चेहरा, दाट कुरळे काळे केस आणि कपाळावर गंध असलेले रामदास चौधरी तिथे बसले होते. शाळेच्या लिपिक पदासाठी मुलाखत देण्याचा त्यांचा निर्णय काही झाला नव्हता. रावेर येथील त्यावेळच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ते माझ्या वर्गात शिकत होते. त्या शिक्षणासाठी ते बलवाडीहून पायी किंवा सायकल वर निंभोरा स्टेशन, तेथून पॅसेंजरने रावेर रेल्वे स्टेशन वर येत आणि तेथून रावेर महाविद्यालयात आणि महाविद्यालय सुटल्यावर पुन्हा पायी रेल्वे स्थानकावर आणि पॅसेंजरने पुन्हा निंभोरा स्टेशन आणि तिथून पुन्हा बलवाडी असा प्रवास करीत. त्यांच्या सोबत खिर्डी, निंभोरा येथील किमान १०-१२ मुलं - मुली असत. 

मी शाळेत लागण्यापूर्वी बलवाडीतील माझी ओळख असलेली पहिली व्यक्ती म्हणजे रामदास चौधरी. 

शाळेत लिपिक पदाची जबाबदारी त्यांना मिळाल्यावर पहिल्या वर्षी अनेकदा आम्हाला शाळेच्या परवानगी, मान्यता, अंतिम मान्यतेसाठी जळगाव आणि नाशिकला फेऱ्या माराव्या लागत.त्यावेळी वाहतुकीची साधने फारशी उपलब्ध नसल्याने मी मोटारसायकलवर त्यांना  घ्यायला आणि जळगावचे काम झाल्यावर सोडायलाही बलवाडीला जाई. त्यावेळी मी अनेकदा त्यांच्या घरी जेवलो आहे. दीर्घकाळ ते संयुक्त कुटुंब पद्धतीने जीवन जगले. त्यांचे बंधू श्री अनिल चौधरी आणि श्री विकास चौधरी हे देखील प्रेमळ, हसमुख आणि आम्हां शिक्षकांबद्दल कमालीचा स्नेह- आदर असलेले आहेत.

श्री रामभाऊ लिपिक म्हणून सर्वच कागदपत्र ते अगदी व्यवस्थित पूर्तता करून देत असत. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार बाजीराव नाना पाटील व सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दोन-तीन महिन्यातच शाळेची मान्यता ही आली. रामभाऊंनी तयार केलेल्या कागदपत्रांमध्ये किंवा फाईल मध्ये कधीही कोणतीही त्रुटी किंवा अपूर्तता आढळून आल्याचे मला आठवत नाही इतके त्यांचे काम नीटनेटके होते आणि आहे.  

शाळेचं युनिट सुरुवातीपासूनच छोटेसे आहे म्हणजे इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत प्रत्येक इयत्तेची एकच तुकडी आहे. पण या सर्वच युनिटचे कामकाज आणि कागदपत्र, दप्तर रामभाऊंनी अतिशय नीटनेटके ठेवले आहे. संगणकाचे कुठलेही औपचारिक शिक्षण - प्रशिक्षण न घेता किंवा पदवी न घेता स्वप्रयत्नाने, चौकस बुद्धीने माहिती मिळवून ते संगणक अतिशय कुशलतेने हाताळतात. त्यानंतर दिवसेंदिवस  शाळेचा व्याप वाढत गेला, कागदपत्र वाढली, दप्तरही वाढलं, फायलीही वाढल्या आणि कपाटही वाढली पण कुठे काय ठेवले आहे हे त्यांना अचूक माहिती असते. एखादा आवश्यक कागद त्यांनी कपाट उघडल्यावर त्यांना सापडला नाही असे कधी झाले नाही. शाळेच्या वेतनाची बिले असतील किंवा इन्कम टॅक्सचे कॅल्क्युलेशन असो - रामभाऊंनी तयार केलेल्या बिलात कधीच फरक झाला नाही. मलाही या अकाउंट पद्धतीची थोडीफार माहिती असल्याने अनेकदा बिले तयार करताना किंवा इन्कम टॅक्सचे कॅल्क्युलेशन करताना ते मलाही बोलवत. त्यावेळी मी त्यांच्या कामातील सफाई आणि अचूकता अनुभवत असे.

 आमचे रामदास चौधरी एका बाबतीत आमच्या स्टाफमध्ये सर्वाधिक भाग्यवान आहेत असे मी म्हणेन. ते सेवानिवृत्त होत असताना त्यांचे बाबा आणि आई हे दोघेही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी हयात आहेत ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. तसेच सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांच्या मुलगा -रोहित आणि मुलगी- नेहा या दोघांचाही विवाह झाला आहे हे ही विशेष! त्यांची दोन्ही मुले आमच्या शाळेत शिकली पण ती शिकताना आमचे वडील या शाळेत भाऊसाहेब आहेत असा अविर्भाव मला त्यांच्यात कधीही दिसला नाही… 

रामदास चौधरी यांना सुरुवातीपासून गावातील भजनी मंडळात जाण्याची आवड आहे. कीर्तनात मृदुंग वादन करणे ही कला त्यांनी छंद - आवड म्हणून शिकून घेतली आहे. अनेक छोट्या मोठ्या कीर्तनकारांसोबत कीर्तनात त्यांनी मृदुंगाची साथ त्यांना दिली आहे.परिसरातील किमान ५-२५ गावांतील विविध सप्ताहात ते मृदुंगाचार्य म्हणून विख्यात आहेत. इतकेच नव्हे तर गावातील किंवा परिसरातील निधनप्रसंगी अंत्ययात्रेतील भजनी मंडळातही मी त्यांना तल्लीन होऊन भजने म्हणतांना पाहिले आहे. बलवाडी गावातील भागवत सप्ताहाचे आयोजन, त्याचे नेतृत्व रामभाऊंकडे असते. संपूर्ण गावातून गोळा होणाऱ्या वर्गणीचा हिशोब, त्याचा खर्च आणि शिल्लक हा सर्वच कारभार ते पारदर्शकपणे पाहतात.

 ३० एप्रिलला या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी  शाळेचे चित्रगुप्त सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना दीर्घ आयुष्यासाठी निरामय आरोग्याच्या शुभेच्छा!💐

Comments